आखणी एक गुन्हा दाखल : चक्क शिक्षणसम्राटाला खंडणी मागितल्याचे उघडकीस
वर्धा. खंडणीखोर तोतया पत्रकार मंगेश चोरे याचे कारनामे एक एक करीत पुढे येत आहेत. पोलिस मागावर असल्याने गेल्या १८ दिवसांपासून त्याची सतत भागमभाग सुरू आहे. दरम्यान, पीडितांनी पुढे येऊन चोरे विरोधात तक्रार देण्याचे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत फसवणूक झालेली मंडळी तक्रारीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याने वर्धा (Wardha) येथील दिग्गज शिक्षण सम्राटालाही (Emperor of education) धमकावून १० लाखांची खंडणी मागितल्याची (Demand Ransom) बाब समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मंगेश चोरेविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.
डिझेल चोरीच्या धंद्या संदर्भात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून मंगेश चोरे याने शहरातीलच एका पत्रकारांवर जिवघेणा हल्ला केला. यासंदर्भात सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सेलू पोलिस ठाण्यात देखील गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याने आपल्या फायद्यासाठी खासदारांचे चिरंजीव पंकज तडस यांच्या नावाचाही वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणातही गुन्हा दाखल आहे. स्वतःला पत्राकार सांगणाऱ्या अनेकांना गंडा घातल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होती. मंग्याच्या खुरापती समोर येत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन फसवणूक झालेल्या व्यक्तींना तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तक्रारदार समोरही येत आहेत. याच दरम्यान मंग्याने वर्धा येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन नाकारला.
मंग्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. पण, गुन्हे दाखल होत असल्याने तो फरार झाला आहे. दरम्यान, शहरातील शिक्षणसम्राट सचिन अग्निहोत्री यांनी शुक्रवारी ठाण्यात पोहोचून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, मंगेश चोरे नामक भामट्याने आपल्या पोर्टलवर हत्येच्या आरोपाखाली बदनामीचा कट रचून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या तक्रारीवरून शहर पोलिसानी भांदविच्या कलम ३८९, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलिस करीत आहे. ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात हा आरोपी मंगेश चोरे आहे, त्यांची कुंडली पोलिस तपासतील अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.