बच्चू कडू म्हणतात, राहुल गांधींवरील कारवाई चुकीची

0

मुंबईः सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना (MLA Bacchu Kadu) नाशिकच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल यांच्याप्रमाणेच बच्चू कडू यांच्यावरही कारवाई होणार की कसे, अशी चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून तसे बॅनर्सही लावले गेले आहेत. तर दुसरीकडे माझ्यावर कारवाई झाली तर मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई चुकीची असल्याची प्रतिक्रिया देखील कडू यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द करण्यात आली. त्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयावर बच्चू कडू यांनी सरकारला टोला लगावला असून आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटत असून ती घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविताना सरकारने केली पाहिजे. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काय म्हणजे?
दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईचा धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसने बच्चू कडू यांच्यावरही कारवाई होणार काय, असा प्रश्न विचारला आहे. पुण्यात यासंबंधीचे बॅनर्स लागले आहेत. बॅनरवर लिहिले आहे की, “अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान” असा संदेशही बॅनरवर लिहिला गेलाय.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा