राहुल गांधींवरील कारवाईवर विरोधकांचे मूक आंदोलन

0

मुंबई– विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले (MVA Stages protest against disqualification of Rahul Gandhi). अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मविआचे आमदार तोंडाला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर बसले होते. यावेळी यातील काही आमदारांनी हातामध्ये लोकशाहीची हत्या असे फलकही धरले होते.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने काल विधानसभेतून सभात्याग (Walkout from Legislative Assembly) केला होता. राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी घटना असून हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. विधानसभेच्या पायऱ्यांवर या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हजारो कोटींचा चुना लावून देशातून पळून गेलेत. राहुल गांधी हे या विरोधात आवाज बुलंद करीत असताना त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा