केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्त्यात वाढ

0

 

 

नवी दिल्लीः केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा (DA increased for Central Government Employees) दिलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने आपल्या एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याची घोषणा केली असली तरी १ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या एक कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. गेल्यावर्षी महागाई भत्त्यात सप्टेंबर महिन्यात शेवटची वाढ करण्यात आली होती.
यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, महागाई भत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारवर १२,८१५ कोटी रुपयांचा आर्थिक बोझा येणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून भत्त्यात वाढ लागू करण्यात आली आहे. दर महिन्याला जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर ही वाढ आधारित असते. ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर कमी होऊन ६.४४% झाला, मुख्यत्वे अन्न आणि इंधनाच्या वस्तूंच्या किमतीत किरकोळ घट झाल्यामुळे तो घसरल्याचे दिसत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सोयीसाठी वाढत्या किमतींची भरपाई करण्यासाठी महागाई भत्ता वाढवला जातो. महागाई भत्ता आणि महागाई मदत वर्षातून दोनदा वेळोवेळी सुधारित करून वाढवली जाते. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलेेले आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा