नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचे प्रकरण आता राज्यसभेकडे (Rajya Sabha) जाणार आहे. राऊतांवरील कारवाई संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. आजच हे हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेकडून काय अभिप्राय येतो, याकडे लक्ष लागलेले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. याला राऊतांनी उत्तर दिले होते. हक्कभंग समितीविषयी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवत राऊतांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेतला आहे. समिती तटस्थ नसल्याचा राऊतांचा दावा आहे.
खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणला होता. त्यासाठी समिती स्थापन करून संजय राऊत यांना नोटिसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता.