मुंबईः भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा सातत्याने सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule Statement on Pankaja Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य करणारे महत्वाचे वक्तव्य केले आहे. सध्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिले. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत” असेही ते म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही माझ्या नंतर बोला, मी आधी बोलतो हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी व्यस्तता असते. देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये उपमुख्यमंत्री या नात्याने गेले होते. त्या कार्यक्रमात एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का? असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. एक नेता कार्यक्रमास गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. यातून कोणताही वेगळा अर्थ काढू नये, असे बावनकुळे म्हणाले.
पंकजा या दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. कारण त्यांच्या रक्तातच भाजप आहे. या सर्व फक्त चर्चा आहेत. विरोधी पक्षांनी आपापले पक्ष सांभाळले पाहिजे, त्यांनी पंकजांबद्धल अफवा पसरविण्याचे काम करु नये. त्या प्रगल्भ नेत्या आहेत, असेही ते म्हणाले.
अलिकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही त्यांना सातत्याने पक्षात येण्याचे आवाहन केले जात आहे.