आणि राष्ट्रीय महामार्गावरील शेकडो अर्जुन वृक्ष राहिले सुरक्षित

0

मनसरमध्ये झाला बोधीसत्व नागार्जुन यांचा जन्म

-भदंत नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली माहिती,ना गडकरींचे आभार

नागपूर :आयुर्वेद व रसायनाचे जनक, महायान (बुध्दीजम)चे संस्थापक बोधीसत्व नागार्जुन यांचे जन्मस्थान नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम करताना शेकडो अर्जुन वृक्षांची कत्तल होईल अशी भीती होती. मात्र, अभियंत्यांनी कल्पकतेचा वापर केल्यामुळे शेकडो अर्जुन वृक्षाला धक्कासुद्धा लागला नाही. विशेष म्हणजे आता या सर्व वृक्षाभोवती सुरक्षाकवच बांधण्यात आले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागर्जुन सुरेई ससाई यांनी आज माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. इंदोरा बुध्द विहार येथील निवासस्थानी ते बोलत होते.
तथागत गौतम बुध्द यांच्या जन्मानंतर 600 वर्षांनी बोधीसत्व नागार्जुन यांचा जन्म विदर्भात झाला, असा उल्लेख कुमारजीव यांनी नागार्जुनाच्या जीवन चारित्र्यात केला आहे. मात्र, नेमका कुठे (स्थान) जन्म झाला या बाबत उल्लेख नाही. नागार्जुनाच्या शंभर वर्षांनंतर जन्मलेले कुमारजीव यांनी महायान त्रिपीटकाचे चीनी भाषेत भाषांतरही केले. पुढे भदंत ससाई यांनी मनसर येथे उत्खनन करून संशोधन केले आणि मनसर हेच नागार्जुनाचे जन्मस्थळ आहे, असे घोषित केले. या परिसरातील शेकडो अर्जुन वृक्ष नागार्जुनाच्या जन्माची साक्ष देतात, असेही ससाई म्हणाले.
रामटेक-तुमसर या राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा 300 च्या जवळपास अर्जुन वृक्ष आहेत. अलिकडेच या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली 40 ते 50 फूट उंचींच्या वृक्षांची कत्तल होईल, अशी भीती होती. सुरुवातीला रस्त्याच्या बांधकामात नागार्जुन टेकडीखाली असलेल्या पाच वृक्षाची कत्तल करण्यात आली. यामुळे प्रचंड दुखावल्याचे ससाई म्हणाले. यानंतर
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रामटेक कार्यालयातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. रामटेकचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अर्जुन वृक्षाचे महत्त्व सांगितले. गडकरी यांनी ससाईंच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ अधिकार्‍यांना निर्देश दिले. रस्ते बांधकाम करताना एकही वृक्ष तुटणार नाही, याची दखल घेण्यास सांगितले. अर्जुन वृक्ष सुरक्षित ठेवल्याबद्दल सुरेई ससाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

700 अर्जुना वृक्षाचे रोपण
दरम्यान, सुरेई ससाई यांनी आयुर्वेदाचार्य नागार्जुनाच्या जन्मस्थानी तब्बल 700 अर्जुन वृक्ष लावले. बोधीसत्व नागार्जुन महाविहार, नालंदा महाविहार, मंजुश्री महाविहार, किसा गौतमी विहार परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. आता हे वृक्ष मोठे होत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा