मुन्ना यादवच्या मुलाचा क्रिकेट सामन्यादरम्यान गोंधळ

0

स्कोअररला मारहाण, संदीप जोशी म्हणाले ‘खेळाडू जारा तापटच असतात

नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari ) यांच्या संकल्पनेतून सध्या शहराच्या विविध मैदानांवर खासदार क्रीडा महोत्सव (Khasdar krida mahotsav) सुरू आहे. याअंतर्गत छत्रपतीनगरातील क्रिकेट मैदानावर क्रिकेट सामन्याचे देखील आयोजन करकण्यात आले आहे. त्यात भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा किरण यादव याने स्कोअररला बॅटने मारहाण करीत जखमी केले. प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा रात्री किरण मैदानावर पोहोचला आणि आयोजकांना धमकावले. दरम्यान, जखमी स्कोअरर दुसऱ्या दिवशी घटनेची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याची तक्रार घेत मेडिकलसाठी रवाना केले. त्यानंतर अचानक तो बेपत्ता झाला. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच महोत्सवाचे आयोजक माजी महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना विचारले असता, खेळाडू थोडे गरमच असतात, अशी प्रतिक्रिया नोंदविली. सोबतच याचा अर्थ झालेल्या घटनेचे मी समर्थन करतोय असे नाही. तर खेळताना एक स्पिरिट निर्माण होते. त्यामध्ये भावनेच्या भरात खेळाडू कधी कधी आक्रमक होतात. असाच काहीसा प्रकार परवा खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान घडला आणि हाणामारीची घटना घडली. त्यानंतर खेळाडू आणि पंचांना सावरण्याचे काम आम्ही आयोजक या नात्याने केले असल्याचे ते म्हणाले.

संदीप जोशी पुढे म्हणाले की, खेळां दरम्यान अशा घटना घडू नये, याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतो. पण कधी ना कधी, कुठे ना कुठे एखादी अशी घटना घडते, असेही संदीप जोशी म्हणाले. मुन्ना यादव यांचा मुलगा करण याने पंचांना मारहाण केली आणि मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. आता मारहाण करणाऱ्यावर कारवाई होईल का, असे विचारले असता, या प्रकाराची पोलिसांत तक्रार झाली की नाही, हे मला माहिती नाही. पण आमच्या स्तरावर चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांना देणार आहोत. मारहाणीचा प्रकार अजिबात योग्य नाही आणि नितीन गडकरींनी महोत्सव आयोजित केला आणि भाजप नेत्याने त्यामध्ये गडबड केली, या दृष्टीने या घटनेकडे बघणे योग्य नाही, असे जोशी यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठा इव्हेंट

खासदार क्रीडा महोत्सव देशातला सर्वात मोठा क्रीडा इव्हेट आहे. यामध्ये केवळ १३ दिवसांत ६२ क्रीडांगणांवर ५५ खेळांच्या स्पर्धा होत आहे. इतक्या मोठ्या आयोजनामध्ये कुठेतरी लहान मोठ्या घटना घडतील, याचा अंदाज असतोच. काही घटना मिडियापर्यंत पोहोचतात, काही पोहोचत नाहीत. त्यातील ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली घटना आहे. पण या घटनेला वेगळा ॲगल देऊ नये, असे आयोजक म्हणून आमचा आग्रह असणार आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा