विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरोश्वर टेमुर्डे यांचे निधन

0

पहाटे घेतला अखेरचा श्वास, कुटुंबीय करणार देहदानाची इच्छा पूर्ण

चंद्रपूर. वरोरा (Varora) विधानसभेचे माजी आमदार, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे (Moreshwar temurde) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुष्य वेचणारे टेमुर्डे यांनी मृत्युनंतर देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उपयोगी यावा यादृष्टीने देहदानाची (body donation) सूचना कुटुंबीयांना केली होती. त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी व मोठा चाहता वर्ग आहे. टेमुर्डे यांच्या निधनाचे वृत्त पुढे येताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते पोहोचत आहेत.
मोरेश्वर टेमूर्डे यांनी 1985 मध्ये अपक्ष तर 1990 मध्ये जनता दलाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 5 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा थाटात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळकले जायचे. अपक्ष, जनता दल, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काम केले. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग आहे.
मोरेश्वर टेमुर्डे यांनी कधीही कुणाला दुखावलेले नाही. वकिली व्यवसाय करताना गावागावातील लोकांशी आणि शेतकऱ्यांशी नाते जोडले. जनतेशी जनसंपर्क कायम ठेवला. त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या मनात कायम स्थान निर्माण केले. त्यामुळे जनतेनी त्यांना लोकनेते म्हणून मान्य केले आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते झाले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर विषयाची चर्चा विधानसभेत सलग ४८ तास चालली होती.
३० डिसेंबर १९९३ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी एक पत्र सभागृहात वाचून दाखवले. या पत्रावर मोरेश्वर टेमुर्डे, वसंतराव बोंडे, वामनराव चटप, शिवराज तोंडचिरकर व सरोज काशीकर या पाच आमदारांच्या सह्या होत्या. १९९० च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे हे पाच पाईक जनता दलाच्या चिन्हावर निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत जनता दलाची शिस्त त्यांनी कसोशीने पाळली होती. अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये या पाच आमदारांनी जनता दल विधानसभा पक्षापासून फारकत घेऊन सभागृहात स्वतंत्र गट म्हणून बसण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता.