नागपूर: गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने भारताची मान जगात उंचावली. इतिहासातले सर्वाधिक चांगले सरकार असा नावलौकिक झाल्याने जनतेचा भाजपवर विश्वास आहे. शेवटी आम्ही काही संन्यासी नाही, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपले मातीचे घर आज ना उद्या पडणार या भीतीने लोक भाजपात येत आहेत आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत. भिन्न विचारांच्या व्यक्तीच्या कार्यक्रमात जाणे यात गैर नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षे पक्षाला सेवा दिली. नऊ वेळा ते निवडून आले अशा व्यक्तीला नाराज व्हावे लागते ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, आपण ना त्यांना ऑफर दिली किंवा त्यांनी कुठलीही आपल्याशी चर्चा केली हा त्यांचा व्यक्तिगत आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना फोन केला तेव्हा देखील त्यांचा फोन बंद होता.आता थोरात यांची नाराजी कशामुळे आहे हे नाना पटोले यांनाच माहीत,असा टोमणा त्यांनीलगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम ट्युनिंग असून महाराष्ट्राचे विकासासाठी ते दोघेही काम करत आहेत. बजेट मध्ये काय हवे याविषयीच्या सूचना त्यांनी मागितल्या आहेत खासदार संजय राऊत यांनी देखील याविषयीच्या सूचना केल्या तर निश्चितच स्वागत केले जाईल. उठसुठ सकाळी नऊ वाजता उठून विरोधक टीका करीत असतात. विरोधक आणि सत्तारूढ समन्वयातून महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य करता येऊ शकते. मुंबई ,पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांसाठी चांगले काय करण्यासारखे आहे त्याची चर्चा न करता ते केवळ टीका करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी देखील त्यांनी नुसती टीका केली. त्यापेक्षा रचनात्मक गोष्टी सांगण्याची गरज आहे नऊ वाजताचा हा भोंगा बंद झाला पाहिजे याकडे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता पुन्हा एकदा लक्ष वेधले