चंद्रपूर 14 मे – जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली आहे.
जुनी पेन्शन योजना हा शासकीय कर्मचाऱ्यांना हक्क आहे. परंतु, कर्नाटक राज्यातील भाजप सरकारने तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे कर्मचारी,त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक अशा सर्वांमध्येच नाराजी होती. विधानसभेच्या निवडणुकीत या सर्व जनतेने मतदानाच्या रुपात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आपली नाराजी मतदानातून दर्शवित शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून बाहेर खेचतील, असेही आमदार सुधाकर अडबाले यांनी म्हटले आहे.