
मुंबई ः महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीने उद्या १७ डिसेंबरला मुंबईत हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांनी केला आहे.
पटोले म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकांची दादागिरी वाढली आहे. राजरोसपणे धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा व त्यांच्या कार्याचा अपमान करणारेच होते, त्यात दुमत नाही. पण भाजपाच्या एकाही नेत्यांने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही व माफी मागण्याचे सौजन्यही दाखवले नाही. मुंबईत उद्या १७ तारखेला महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा हा अतिप्रचंड व भाजपाचr बोलती बंद करणारा असेल. भाजपाची जनतेत पत राहिलेली नाही. जनतेत प्रचंड असंतोष आहे. म्हणून उरलेली पत राखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे आमदार आशिष शेलार करत आहेत, असा आरोपही पटोलेंनी केला.