शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थीनीला पहिल्या मजल्यावरून खाली ढकलले!

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शुक्रवारी अतिशय धक्कादायक घटना घडली. शिक्षिकेने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत विद्यार्थीनी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून (Student pushed off first floor by teacher at Delhi school) हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. यासंदर्भात पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध भदंवि कलम ३०७ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गीता देशवाल असे या शिक्षिकेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.


राजधानी दिल्लीच्या फिल्मिस्तान भागातील मॉडेल बस्ती येथील प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या शिक्षिकेने पाचवीत शिकणाऱ्या या १० वर्षीय विद्यार्थिनीला कात्रीने मारहाण करत शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले. त्यामुळे शाळेत एकच खळबळ माजली. शाळेतील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यावर पोलिस पथक शाळेत पोहोचले. पोलिसांनी जखमी मुलीला जवळच्या हिंदुराव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही शाळा दिल्ली महानगर पालिकेची आहे. पोलिसांनी जखमी मुलीची विचारपूस करून तिचे बयाण नोंदवून घेतले. शिक्षिकेने असे कृत्य का केले, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.