चौकशीनंतर होणार कारवाई : बाजू मांडण्यासाठी मिळणार वेळ
नागपूर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा संपूर्ण विभागात शांततेत पार पडल्या. परीक्षेदरम्यान विभागाने केलेल्या तयारीमुळे एकाही केंद्रावर मास कॉपीसह बोगस विद्यार्थी आढळून आले नाहीत. दरवर्षीच्या तुलनेत यावेळी कॉपीची प्रकरणाही कमी आहेत. कॉपी करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांवर आता कारवाई होणार आहे. यापूर्वी शिक्षण विभागातील 4 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसमोर या विद्यार्थ्यांना हजर करण्यात येईल. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. कॉपीच्या प्रकारानुसार कारवाईचा निर्णय घेतला जाईल. बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, विविध प्रवेश परीक्षांची तयारीही विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. यावेळी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यामध्ये मंडळाव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाकडून विविध पथक तयार करण्यात आले होते. त्यामुळेच विभागाच्या एकाही केंद्रावर सामूहिक कॉपी किंवा बोगस विद्यार्थी बसण्याच्या घटना घडल्या नाहीत.
यंदा विभागातून एकूण 1,53,436 विद्यार्थी 10 वीच्या परीक्षेला परीक्षेला बसले होते. एकूण 682 केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत कॉपीची सर्वाधिक 11 प्रकरणे गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहेत. यानंतर वर्ध्यात 8, गडचिरोलीत 4 आणि भंडारा येथील 3 अशी एकूण 26 कॉपीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर चंद्रपूर, नागपूर शहर आणि ग्रामीण भागात कॉपीची एकही घटना घडलेली नाही. तसेच बारावीच्या परीक्षेला एकूण 1,55,279 विद्यार्थी बसले होते. 484 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 27 कॉपीची प्रकरणे समोर आली. यापाठोपात वर्धा 16, चंद्रपूर 4, भंडारा 4 आणि नागपूर जिल्ह्यातील 1 अशा एकूण 52 प्रकरणांची नोंद झाली आहे.
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. यासाठी मंडळाने शिक्षण विभागातील 4 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. विद्यार्थी समितीसमोर आपली बाजू मांडतील. त्यानंतर समिती आपला अहवाल बोर्डाला सादर करेल. कॉपीच्या प्रकारानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षेचा निर्णय बोर्डाकडून घेतला जाईल. नियमांनुसार, विद्यार्थ्यांना एक ते पाच परीक्षांपासून डिबार केले जाऊ शकते, परंतु, बहुतेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेतून डिबारमेंटची शिक्षा मिळते. बोर्डाने 12 वीच्या कॉपीबहाद्दरांना 28 मार्चला तर 10 वीच्या कॉपीबहाद्दरांना 29 मार्चला सुनावणीसाठी बोलावले आहे.