बुलढाणा – शहरात पुन्हा चोरटे सक्रीय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात काल रात्री सव्वादोन लाखांची घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रक्कमेसह दागीने लंपास केले आहेत. रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील कपाट फोडून त्यातील २ लाखाची रोख रक्कम व २० हजारांचे दागीने असा एकूण २ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याबाबत अविनाश ओंकार सोनोने (३८) यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तीन ते चार चोरटे दिसून येत आहेत.















