अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार, फडणवीसांनी पुन्हा दिला नवा मुहुर्त

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत आजवर अनेक मुहुर्त दिले गेले व ते सपशेल चुकले आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी नवा मुहुर्त दिलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना (State Cabinet Expansion before budget Session) दिली. यापूर्वी फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनानंतर तातडीने विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातील अनेक विषयांवर भाष्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मला कारागृहात डांबण्याचे लक्ष्य तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते, याचा पुनरूच्चारही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari) आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. याकडे लक्ष वेधले असता आपल्याशी खासगीत बोलताना राज्यपालांनी अनेकदा पदमुक्त करण्याचे म्हटलेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले. तसेच मातोश्री दरवाजे त्यांनीच बंद केले, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाबाबतही आपले मत व्यक्त केले. हा केवळ महामार्ग नाही तर आर्थिक भरभराट आणणारा कॉरिडोर असून आगामी २० वर्षात रस्त्याच्या दोन्ही बाजुला आर्थिक भरभराट अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.