औरंगाबादः सीआयडी म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने सचखंड एक्सप्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Police Constable commit suicide in Aurangabad) येथे उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या ४२ वर्षीय कर्मचाऱ्याचे नाव अनिल सोनवणे असे असून तो औरंगाबादचा रहिवासी आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद केली आहे. सोनवणे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणापायी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यांचे सहकारी तसेच नातेवाईकांची विचारपूस सुरु असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे हे औरंगाबादला राज्य गुन्हे अन्वेषण विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. २०१८ मध्ये वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्यांची नेमणूक झाली होती. सोमवारी दुपारी त्यांनी धावत्या सचखंड एकप्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह घाटी रुग्णालयात आणला. तेथेच सोनावणे यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. काल सकाळी ते सीआयडी कार्यालयात चाललो, असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, कार्यालयात न जाता त्यांनी रेल्वेस्थानक गाठले व फलाट क्रमांक २ वरून सुटलेल्या गाडीपुढे त्यांनी उडी घेतली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धक्का बसला. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचीच चर्चा सध्या पोलिस वर्तुळात सुरु आहे.