प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा-सुधीर मुनगंटीवार

0

चंद्रपूरः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेमके कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घोर काँग्रेस विरोधी होते व काँग्रेस हे जळते घर असल्याचे विचार त्यांनी मांडले होते. बाबासाहेबांना काँग्रेसने दिलेली वागणूक लक्षात घेता प्रकाश आंबेडकरांनी सारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा कारण बाबासाहेबांच्या अनुयायांना त्यांचे काँग्रेससोबत जाणे कधीच आवडणार नाही, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (BJP Senior Leader Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीवर मांडले आहे.

या नव्या युतीवर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले, “देशाला घटना देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांना १९८९ पर्यंत भारतरत्न दिले गेले नव्हते. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान पं. नेहरू यांनी स्वतःच स्वतःला भारतरत्न दिले. केंद्र सरकारकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत. स्वतःच स्वतःला भारतरत्न देण्याची अशी अद्वितीय घटना जगात पहिल्यांदाच घडली. ज्या भारतरत्न बाबासाहेबांनी या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत समता, ममता व बंधुत्व यावे, यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण संविधान १९५० मध्ये देशाला समर्पित केले, त्यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसने नेहमीच नकार दिला. बाबासाहेबांसारखा प्रज्ञासूर्य संसदेत जावा, याला काँग्रेसने विरोध केला होता. त्यांना पराभूत करण्यासाठी स्वतः पं. नेहरू आले होते. एका कमी शिकलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून बाबासाहेबांचा पराभव केला गेला. काँग्रेसची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घ्यावा. त्यांनी काँग्रेससोबत जाणे हे बाबासाहेबांच्या अनुयायांना कधीच आवडणार नाही” असेही मुनगंटीवार म्हणाले.