वर्षभरात २४१ मुले बेपत्ता

0

चंद्रपुरात धक्कादायक नोंद ; मुलींची संख्या सर्वाधिक

चंद्रपूर. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra state) गेल्या काही वर्षांपासून मुले बेपत्ता होण्याच्या घटना वाढतच आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur district ) दररोज मुले बेपत्ता होणे व अपहरणासारख्या (kidnapping) घटना समोर येत आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातून १,६१७ नागरिक बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल आहेत. त्यात तब्बल २०२ मुली आणि ३९ मुले आश्या २४१ अल्पवयीनांचा मुलांचा समावेश आहे. २११ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप २६ मुली आणि दोन मुलांचा शोध लागलेला नाही. एकूण बेपत्ता व्यक्तिंपैकी १, ३०६ नागरिकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ६२० पुरुष, तर ९९७ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांनी ४९१ पुरुष आणि ८१५ महिलांना शोधले आहे.
रागाच्या भरात घरातून निघून जाणे, आई-वडिलांवर रुसून निघून जाणे, घरात भांडण झाले म्हणून निघून जाणे, बदनामीच्या किंवा मार खाण्याच्या भीतीने घर सोडणे, प्रेम प्रकरण, वेडसरपणा अशी अनेक कारणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत. आजघडीला ३११ नागरिकांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वर्षभरात दोनशेवर अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे.
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. मुली, युवती घरातही सुरक्षित नसल्याचे वाढत्या गुन्हेगारी घटनांमधून समोर आले आहे. त्यातच अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची आकडेवारी धक्कादायक आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मुलींचा शोध घेतलेला आहे. मुलांचे बेपत्ता होण्याचे वाढलेले प्रमाण पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. बेपत्ता मुलांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिस दलापुढे आहे.
मागील वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बहुतेक नागरिकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित नागरिक, मुलांचा शोध सुरू आहे, असे चंद्रपूर एलसीबीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा