मुंबई : कार्डिलिया क्रूझवरील कथित ड्रग्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरांसह त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर सीबीआयने छापे (CBI Raids on Former NCB Director Sameer Wankhede) टाकल्याची माहिती आहे. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहितीी असून एनसीबीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. याच गुन्ह्याच्या अनुशंगाने ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले.
समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक पथक गठीत करण्यात आले होते. या पथकाने चौकशी करून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल वरीष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालावरून सीबीआयकडून ही कारवाई होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्यामधील 50 लाख रुपये स्वीकारण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात वानखेडे यांच्याशी संबंधित 29 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबईसह दिल्ली, कानपूर आणि रांचीतील ठिकाणांचा यात समावेश आहे. समीर वानखेडे यांचे वडील, बहीण, सासू-सासरे यांच्या घरीही सीबीआयची टीम पोहोचल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही कारवाई सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.