नागपूर – सातगाव वेणा हिंगणा तालुका मधील बेघर झालेल्या 336 कुटुंबांच्या संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर 18 व्या दिवशी यश मिळाले. आंदोलनस्थळी आज उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी भेट दिली. युवा परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. घरदारांवर ग्रामपंचायतने बुलडोजर चालविला, नववधूला घर नसल्याने तिचा साखरपुडा याच ठिकाणी रस्त्यावर पार पडला.ऊन, वारा, पाऊस झेलत हक्काच्या जागेसाठी हे लक्षवेधी आंदोलन सुरु होते. आंदोलनकर्त्यांच्या दोन मुख्य मागण्या होत्या यात तातडीने अस्थायी निवारा व्यवस्था व व स्थायी स्वरूपात कोणत्याही शासकीय योजनेमध्ये घर देण्यात यावे.11 मे रोजी उप विभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हिंगणा गट विकास अधिकारी यांना सातगाव वेनामध्ये बेघर झालेल्या लोकांना घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना किंवा अन्य कोणत्याही शासकीय आवास योजनेत तत्काल नोंदवून घेण्याकरिता आदेश दिले.आज उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी या लोकांची अस्थायी व्यवस्था करून देण्याची व्यवस्था करून दिली. हे बघता आज बेघर झालेल्या कुटुंबानी हे आंदोलन परत घेण्याची घोषणा केली.यावेळी संदीप जोशी यांनी म्हटले की एक महिन्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्यास तुम्ही आंदोलनाला परत बसू शकता. एकंदर 18 दिवसाच्या आंदोलनानंतर लोकांना लोकशाही मार्गाने न्याय मिळाला असे प्रतिपादन निहाल पांडे यांनी केले.