सीईओ सौम्या शर्मांनी उलगडला इथवर पोहोचण्याचा प्रवास

0

बच्चे कंपनीच्या प्रश्नांना दिली मनमोकळी उत्तरे


नागपूर. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचा (IAS officer ) दराराच वेगळा असतो. त्यातल्या त्यात शिस्तीच्या कडक असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (CEO) यांच्या रूबाब काही वेगळाच आहे. पण, काल जिल्हा परिषदेत (ZP) आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले की, मॅडम तुम्ही येथे कशा आल्या. शर्मा यांनीही सर्व कामे हतावेगळी ठेवत बच्चे कंपनीच्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. इथवरचा त्यांचा प्रवास, वाटेत आलेल्या अडचणी, समस्यांवर केलेली मात, त्यासाठी लागणारी जिद्द, अशी संपूर्ण वाटचालच त्यांनी मुलांपुढे मांडली. त्याचे झाले असे की काल नरखेड तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. येथे त्यांच्या शिक्षकांनी सौम्या शर्मा यांच्यासोबत विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निरागसपणे प्रश्‍न विचारणे सुरू केले आणि सीईओंनीसुद्धा त्यांच्या सर्व प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे दिली. मॅडम, तुम्ही येथे कशा आल्या, काय काम करता, किती शिकल्या, अशा प्रश्नांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना सामोरे जावे लागले.
सावरगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील ६२ विद्यार्थ्यांना काल जिल्हा परिषदेची सहल घडविण्यात आली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. विद्यार्थ्यांना शाळा, अभ्यासाव्यतिरिक्त ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत तेथील मुख्याध्यापक व उपक्रम प्रमुख वीरेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वात ६२ मुली-मुलांनी नागपुरातील रमन सायन्स सेंटर, दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, अजब बंगला अशा स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर शिक्षण विभागाने मुलांना प्रशासनाची जाणीव, अधिकाऱ्यांच्या भेटी व्हाव्यात म्हणून ‘एक भेट सीईओंना’या उपक्रमाचे आयोजन काही क्षणातच केले.
काल दुपारी हे सर्व चिमुकले प्रथम शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये भेटीला गेले. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या काही विभागांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर सीईओ शर्मा यांची सदिच्छा भेट घेऊन सहलीला निरोप द्यायचे ठरले. सीईओंनी उभे राहून त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमांतून कसे यश संपादन करीत या खुर्चीपर्यंत कसे पोहोचता येते, हेही सांगितले. अनेकानेक प्रश्नांना उत्तरे दिली. आबासाहेब खेडकर सभागृह पाहून विद्यार्थी थक्क झाले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर, उपशिक्षणाधिकारी सुशील बन्सोड, समग्र शिक्षा साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखडे उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा