मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन मुले गंभीर जखमी

0

मनपा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा


अकोला. मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी (Two children seriously injured in attack by dogs ) झाल्याची घटना मलकापूर परिसरात घडली. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून दोन्ही मुलांना सोडवल्याने (citizens rushed in time and rescued both the children from the clutches of the dogs) अनर्थ टळला. जखमी मुलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital )उपचार करण्यात आले. दरम्यान, मोकाट कुत्र्यांच्या समस्येला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करीत पुढील सात दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांनी दिला. शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाकडून मोकाट श्वानांच्या बंदोबस्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सतत घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे लहान मुलांना घराबाहेर व शाळेमध्ये जाणे मुश्किल झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील मलकापूर येथील परी परसोबे ही सहा वर्षाची चिमुकली शाळेमध्ये जात असताना तिच्यावर अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला चढविला. तसेच अंगणामध्ये खेळत असलेल्या तीन वर्षाच्या कबीर गोपनारायण या चिमुकल्या मुलावर पिसाळलेला कुत्र्याने हल्ला केला. या दोन्ही घटनेत लहान मुलांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने या दोन्ही लहान मुलांवर हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक रहिवाशांनी जीवाची पर्वा न करता या दोन्ही मुलांना कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तसेच क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनपा प्रशासनाचा निर्बिजीकरणाचा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग गवई यांनी केला आहे. निर्बिजीकरणावर सुमारे सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने पुढील आठ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पराग गवई यांनी दिला आहे.