कारण वाचून बसेल धक्का, कारण वाचाच…
चंद्रपूर. राज्य नाट्य स्पर्धेच्या (State Drama Competition) चंद्रपूर (Chandrapur) केंद्रावर नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल एका तक्रारीमुळे सांस्कृतिक कार्य संचलनालयाने (Directorate of Cultural Affairs ) रोखून ठेवला आहे. यापूर्वी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली आणि विविध स्पर्धांमध्ये गाजलेली दोन नाटके हिंदुत्व विरोधी असल्याची तक्रार अभविपच्या एका पदाधिकाऱ्याने केल्याने मागील सव्वा महिन्यापासून हा निकाल जाहीर झालेला नाही. ६१ वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सध्या राज्यात विविध केंद्रांवर सुरू आहे. चंद्रपूर केंद्रावर १६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. परीक्षकांनी या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक राज्य संचालनालयाकडे पाठवला. त्यानंतर साधारणतः स्पर्धा पार पडल्यानंतर दोन ते तीन दिवसात संचालनालय निकाल जाहीर करते. मात्र चंद्रपूर केंद्रावर सादर झालेल्या लेखक इरफान मुजावर लिखीत ‘वृंदावन’ आणि ‘तेरे मेरे सपने’ या नाटकातून हिंदुत्व विरोधी प्रसार सुरू असल्याची तक्रार अभविपच्या चंद्रपूर येथील शैलेश दिंडेवार यांनी केली आणि ही नाटके बाद करण्याची मागणी केली. या तक्रारीनंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाने शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवल्याचे कारण देत आतापर्यंत हा निकाल थांबवून ठेवला आहे.
विशेष म्हणजे ही दोन्ही नाटके रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) प्रमाणित केलेली आहे. ‘वृंदावन’ या नाटकासाठी इरफान मुजावर यांना राज्य शासनाच्या २०१६ साली पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनाचा पुरस्कार तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मिळाला आहे. २०१६ पासून ‘वृंदावन’ या नाटकाचे राज्य नाट्य स्पर्धेसह अनेक नाट्य स्पर्धेत प्रयोग सादर झालेले आहेत. तर यंदाच्याच नाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रावर ‘तेरे मेरे सपने’ हे नाटक दुसरे आले असून ते अंतिम फेरीसाठी पाठवण्यात आले आहे.
‘वृंदावन’ नाटकात विधवा आश्रमात राहणाऱ्या विधवांची व्यथा आणि त्यांचे तिथे होणारे शोषण यावर भाष्य करण्यात आले आहे. मात्र हिंदु स्त्रीयांवरील अत्याचार दाखवल्याचे कारण देत या नाटकाला आक्षेप घेण्यात आला आहे. तर ‘तेरे मेरे सपने’ या नाटकात मध्यमवर्गीय जोडप्याने रंगवलेले स्वप्न दाखवले असून त्यांची मुलगी एका दंगलीत अडकते तेव्हा उस्मान नावाचा रिक्षा चालक तिला सुखरूप घरी सोडतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. रिक्षावाला मुस्लिम दाखवल्याने या नाटकाला आक्षेप घेण्यात आला आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात अशा पद्धतीने एका तक्रारीच्या आधारे एक महिन्याहून अधिक काळ निकाल रखडलेला नाही.