गोंदिया. गत तीन-चार महिन्यांपासून प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले (schedule of railway trains was disturbed ) आहे. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या मालगाड्या फर्स्टच्या (Freight trains first ) धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यावर तोडगा निघत नव्हता. बुधवारी रात्री प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले (Passengers alighted on the tracks). रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा संताप व्यक्त केला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. लेटलतीफीवर तत्काळ उपाय करा, असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा प्रवासी देत होते. रेल्वे विभागाने मालगाड्या फस्टचे धोरण अवलंबिले असून यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. याची झळ प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने हे धोरण त्वरित बदलविण्याची मागणी प्रवाशांनी यावेळी रेल्वे विभागाकडे केली.
रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील सर्वच प्रवासी गाड्या विलंबाने धावत आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासाठी तब्बल सहा तास लागत असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पाेहोचण्यास विलंब होत आहे. अनेकांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोहचून तेथून पुढची गाडी पकडून पुढे जाणे शक्य होत नाही. तर दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा याची झळ बसत आहे. हा प्रकार सातत्याने सुरू असून यासंदर्भात रेल्वे विभागाला निवेदन देऊन सुद्धा यात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळच्या सुमारास शालीमार ओखा ही गाडी थांबवून मालगाडी सोडण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली तर काहींनी मालगाडी दगडफेक केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी शांत झाले.