सावित्रीबाई फुलेंचा स्त्री शिक्षणाचा लढा अपूर्णच – भगवान केशभट यांची खंत

0

मुंबई :महिलांना शिक्षण ही गोष्ट समाजासाठी दूर असताना क्रांतीज्योती ( Savitribai Phule ) सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची सुरुवात करून देशात एक नवीन क्रांती केली. परंतु देशातील बहुसंख्य कष्टकरी बहुजन दलित आदिवासी समाजातील मुली आजही शिक्षणापासून वंचित असल्याने सावित्रीबाईंनी सुरू केलेला शिक्षण क्रांतीच्या चळवळीचा लढा अपूर्ण असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते व वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि शंखनाद वाहिनीचे संपादक सुनील कुहीकर, डक्सलेजीसचे व्यवस्थापकीय संचालक दिव्येंदु वर्मा, नाट्य कलावंत अश्विनी हडपे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार, ऍड. अरुण सुरवाडे, नवी मुंबईतील क्रीडा संघटक बंडू खडगी, कारभारी वाघमारे, वैशाली चुंचूवार,आदी मान्यवर उपस्थित होते.महान समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी डक्सलेजीस या विधी सल्लागार संस्थेने खारघर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भगवान केशभट होते.


ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या चळवळीच्या संदर्भात आपण किती यशस्वी झालो, यासाठी सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली. “ब्राह्मण समाजातील महिलांच्या विरोधातील केशवपन सारख्या कूपप्रथा बंद करण्यासाठी महात्मा फुले यांनी देशात पहिला न्हाव्याचा संप घडवून आणला होता. हा संप केवळ ब्राह्मण समाजातील स्त्रियांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अधिकारांचा संप होता त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांचे कार्य हे समाज परिवर्तनाचे होते. त्यामुळे फुले दांपत्य हे केवळ एका विशिष्ट जातीच्या कल्याणासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या हितासाठी लढले. मात्र आज आपण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारानुसार वागतोय का? आपल्या घरात काम करणारी मोलकरीण असो की, कार्यालयात काम करणारे शिपाई यांच्याशी आपण कसे वागतो ? या बाबत आपण आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे कुहीकर यावेळी म्हणाले.

दरम्यान,या कार्यक्रमातील एक अतिथी आणि नाट्य कलावंत अश्विनी हडपे या कार्यक्रम स्थळी थेट सावित्रीबाईच्या रूपात अवतरल्या आणि सुमारे २० मिनिटे सावित्रीबाई बनून त्यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला.