अर्थसंकल्पातून आफ्रिकन सफारीची पुन्हा घोषणा
नागपूर. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoo ) आफ्रिकन सफारी (African Safari ) सुरू करण्याची घोषणा पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. गत वर्षीच्या अधिवेशनातही या बाबतची घोषणा करीत 100 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातून सध्या फेन्सिंगची कामे सुरू आहेत. यामुळे लवकरच नागपूरकरांचे अगदी शहरातच चित्ता, जिराफ, झेब्रा यासारख्या प्राण्यांना जवळून बघण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची चिन्हे (Cheetah, Giraffe, Zebra can be seen up close ) दिसू लागली आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय देशातील सर्वाधिक विस्तिर्ण प्राणिसंग्रहालयांपैकी एक आहे. 26 जानेवारी 2021 ला 120 हेक्टरवरील भारतीय सफारीची सुरुवात झाली. त्यावेळीच येथे अफ्रिकन सफारी सुरू करण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाली होती. गतवर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने आफ्रिकन सफारीची घोषणा करीत 100 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापूर्वीच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची आराखडा व सफारीसाठी मंजुरी मिळाली आहे. आता पुन्हा अर्थसंकल्पातून याबाबतची स्पष्ट घोषणा झाल्याने आगामी काळात कामे झपाट्याने पुन्हे जाण्याची शक्यता बळावली आहे.
63 हेक्टर क्षेत्रात विस्तार
प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या सुमारे 28 प्रजाती राहतील. यात झेब्रा, सिंह, जिराफ, चित्ता, चिंपांझी, वाइल्डबीस्ट, हिप्पोपोटॅमस, बबून्स यांचा समावेश आहे. 63 हेक्टर परिसरात भारतीय सफारीच्यामागे अफ्रिकन सफारी असणार आहे. त्यात सुमारे 13 पिंजरे राहतील. साहसी वन्यजीव सफारीच्या बाबतीत आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. पण आता असाच अनुभव नागपुरातील पर्यटकांनाही घेता येऊ शकणार आहे.
कामांना मिळेल गती
तुर्त आफ्रिकन सफारीसाठी निश्चित करण्या आलेल्या जागेचे फेन्सिंग सुरू आहे. पुढच्या टप्प्यात प्राण्यांची योग्य सुविधा होण्याच्या दृष्टीने कंसल्टंट नियुक्त केले जातील. त्यांच्या सूचनेनुसारच पिंजऱ्यांची रचना असणार आहे. त्यासाठीही निविदा प्रक्रिया केली जाईल. कामांना प्रारंभ झाल्यानंतर प्राणी घेऊन येण्यासंदर्भात देशविदेशातील प्राणिसंग्रहालयाशी बोलणी सुरू होईल. यापूर्वी दुबई सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाशी बोलणी यशस्वी झाली आहे. या प्राणिसंग्रहालयातून अफ्रिकन प्राण्यांच्या प्रजाती आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच या सफारीसाठी भारतातील इतर प्राणिसंग्रहालयातूनही प्राणी आणण्याच्या पर्यायावर विचार केला जात आहे.