
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता युवक : मर्दहूर गावात दहशत
गडचिरोली. अनेक महिन्यांपासून शांत असलेली नक्षल चळवळ दक्षिण गडचिरोली (South Gadchiroli ) भागात सक्रीय होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे. नक्षल्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून आदिवासी युवकाची हत्या केली (Naxalites shot and killed a tribal youth around Thursday night). गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मर्दहुर (Mardhaur in Bhamragarh taluka) या गावात ही घटना घडली असून परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनाथ नरोटे (२६) असे मृत युवकाचे नाव आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी त्याचा खून केल्याची चर्चा परिसरात आहे. मर्दिनटोला चकमकीनंतर नक्षल चळवळ खिळखिळी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवादी अगदी शांत झाले होते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही भयमुक्त वातावरणात जीवन जगत होते. मात्र, नजिकच्या काळात पुन्हा नक्षलवाद्यांची सक्रीयता दिसू लागली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ उच्च शिक्षित होता. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. शहरात राहून त्याचा अभ्यास सुरू होता. होळीनिमित्त तो आपल्या गावी परतला होता. होळीपासून तो गावातच थांबला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली. अगदी उमेदीच्या काळातच नक्षलवाद्यांनी त्याचा घात केला. तो शहरात वास्तव्यास असल्याने गावातून येणाऱ्यांना तो मदतही करायचा. तो पोलिसांना नक्षली चळवळीबाबत माहिती देत असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. यामुळे संधी मिळताच त्याचा खून करण्यात आला.
अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. तो अभ्यासात हुशार असण्यासोबतच स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. तो कुटुंबाचे नाव पुढे नेईल, असा पालकांचाही विश्वास होता. यामुळे कुटुंबीयसुद्धा त्याला कशाचीही कमी पडू देत नव्हते. मात्र, ऐन उमेदीच्या काळातच नक्षलवाद्यांनी त्याला संपविल्याने कुटुंबीयांचेही स्वप्न धुळीला मिळाले आहे. कुणीही पुढे येऊन बोलत नसले तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नक्षल्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होतो आहे.