छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होतेच-संभाजीराजे छत्रपती

0

सातारा : छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आता कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले व या हिंदवी स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी बाईंसाहेबांनी केले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच पण त्यांनी धर्माचे सुद्धा रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही, असे ते म्हणाले. कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संभाजी महाराज हे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक तसेच धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. कोणत्याही बाबत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचे असून ते अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबत करण्यात येणारी विधान बरोबर नाही. इतिहासकारांनी केलेल्या विश्लेषणाचे आपण आत्मचिंतन करायला हवे. काहीतरी विकृत काहीतरी बोलून वाद निर्माण करणे हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. भाजपने यापूर्वीच अजित पवार यांच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले, याकडे भाजपने लक्ष वेधले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा