नागपूर : १0८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाचे यजमानपद मिळाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ जानेवारी रोजी उद््घाटन होणार होते. परंतु पंतप्रधान प्रत्यक्षात उपस्थित राहणार नसून ते ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करणार आहेत.
रातुम नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परिसरात सकाळी ९.३0 वा. इंडियन सायन्स काँग्रेसचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे याचे उद््घाटन करतील. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहील.