चंद्रपूरच्या सभेत जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
चंद्रपूर: संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदीजींच्या याच धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले. ते सोमवारी चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आखलेल्या भाजपच्या मिशन १४४ आणि मिशन २५ या मोहिमांचा जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याप्रसंगी जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारताच्या विकासाचा पाढा वाचला.
ज्या ब्रिटनने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, मंदीच्या काळात त्याच ब्रिटनला मागे टाकून भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, रशिया हे देश महागाईचा सामना करत आहेत. मात्र, भारत महागाई आटोक्यात आणून अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया रचत आहे. आजघडीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतामध्ये ५२ टक्के मोबाईल फोन बाहेर यायचे. मात्र, आज ९७ टक्के मोबाईल फोनची निर्मिती देशात होत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूतपणे पुढे वाटचाल करत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
भाजपच जिंकेल-सुधीर मुनगंटीवार
2019 मध्ये चंद्रपूर लोकसभेची जागा निवडून येऊ शकली नाही याची खंत आहे. पण येणाऱ्या दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेसह सर्व निवडणुका भाजपाच जिंकेल अशी रिटर्न गिफ्ट देऊ, अशी हमी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातून भाजपचे 11 खासदार निवडून येतील, याची ग्वाही दिली.