रायगड-राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial in New Delhi) उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्मारकासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आपण पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील काही शहरांमध्ये शिवचरित्रावर आधारित उद्याने होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोषणा केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमीत्ताने छत्रपती उदयन राजे यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहीजे हे देखील सांगितलं. आम्ही मावळे आहोत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पंतप्रधान मोदींकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे झालं पाहिजे ही भावना निश्चित पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना, राज्यातील प्रत्येक प्रमुख सहा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित उद्याने ५०-५० कोटी रुपये खर्च करून तयार करणार आहोत. त्याच सोबत भरत गोगावले यांची शिवसृष्टीची मागणी आहे. त्याला देखील मी समर्थन देतो आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी शिफारस करतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. प्रतापगड प्राधिककरण जाहिर करण्यात आले असून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती.