काँग्रेसचा अमरावती व नाशिक पदवीधर मतदार संघावर दावा

0

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर (Teachers and Graduate Constituency Election) मतदारसंघाची निवडणुकीत काँग्रेसने नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण या विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक आहेत. काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर ठाकरे गटाने नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केला आहे. तर भाजपकडून या मतदारसंघात पुन्हा एकदा नागो गाणार यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणुकीची अधिसूचना येत्या 5 जानेवारीला निघणार आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर यासाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.

या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. पाच मतदारसंघांपैकी अमरावती पदवीधर व नागपूर शिक्षक हे दोन मतदारसंघ भाजपच्या तर नाशिक मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. कोकण शिक्षक मतदारसंघ शेकापच्या तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी विद्यमान आमदारांनाच संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये अमरावती मतदारंसघात विद्यमान आमदार रणजित पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी विद्यमान आमदार नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी सुधीर ढोणे, माजी अर्थराज्यमंत्री सुनील देशमुख व बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नाशिकमधून पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना संधी मिळते की काय, याकडे लक्ष लागले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा