सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई

0

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या विरोधात (Nashik Graduate Constituency) बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.( Satyajeet Tambe Suspended from Congress) काँग्रेसने त्यांचे वडील सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना सत्यजीत तांबे यांनी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे यांच्यावरील कारवाईची माहिती जाहीर केलीय.

सत्यजीत यांना आम्ही पक्षातून निलंबित केले असून बाळासाहेब थोरात साहेब आमचे नेते आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करु. त्यांची काय भूमिका आहे ते पाहू, असे पटोले यांनी यावर भाष्य करताना सांगितले. थोरात यांनी या मुद्यावर अद्याप भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा मुकाबला रंगणार आहे. शुभांगी पाटील यांनी सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मागितली होती. काही दिवसांसाठी त्या भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यावर राष्ट्रवादी व काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. 30 जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.