चंद्रपूर : “देशातील सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे आसाममध्ये असल्याचा दावा कुठेही आसाम सरकारने केलेला नाही. तेथील मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवांनी आपल्याशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. केंद्र सरकारच्या परिपत्रकात देखील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील भीमाशंकर असल्याचे स्पष्ट नमूद आहे. पण, काही लोकांना यात राजकारणच करायचं असेल तर गोष्ट वेगळी. आमच्या राजकीय नेत्यांना इतिहासात किती गुण मिळतात, हे मला माहिती नाही. मात्र, आम्ही इतिहासकार होत चाललो आहेत.. ” या शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांचा आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.
उद्योगांप्रमाणे महाराष्ट्रातील देवही पळविले जात असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग नसून खरे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याचा दावा खासदार सुळे यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनीही हा मुद्दा पकडून राज्य सरकारवर टिकेची झोड उठविली. त्याचा समाचार सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी घेतला. यासंदर्भात मुनगंटीवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “असेही काही राजकीय नेते आहेत, जे म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही. पण, जेव्हा देवाच्या नावानं राजकारण करण्याची संधी मिळते, त्यावेळी मात्र हे नेते मोठ्या आनंदाने त्यावर राजकारण करीत असतात. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या देवाला पळविल्याचे सुप्रियाताई सांगतात. मी स्वतः आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी यावर चर्चा करून माहिती घेतली. प्रत्यक्षात त्यांनी कुठलाही दावा केलेला नाही. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरे नसल्याचा दावा आम्ही कुठेही केला नसल्याचे त्यांनी स्पष्टच सांगितले. त्यांनी इतकेच सांगितले की आमच्याहीकडे भीमाशंकर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. त्याची जाहिरात अगदी काँग्रेसच्या काळापासून सुरु आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने नमूद केलेल्या तथ्यांशी आम्हीही सहमत आहोत, असेही आसाम सरकारने स्पष्ट केले आहे.”
मुनगंटीवार यांनी यासंदर्भात अधिकार माहिती देताना सांगितले की, “केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘देखो भारत’ जाहिरातीच्या परिपत्रकात देशातील सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे महाराष्ट्रात असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्यांने आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील गोष्टी बदलण्याचे कारण नाही. यापूर्वी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाबाबत देखील असाच वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. बिहारमध्ये काँग्रेसच्या काळात वैजनाथ ज्योतिर्लिंग बिहारमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, नेमकी मान्यता आहे काय आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. मान्यता ही ऐतिहासिक तथ्यांवर, कथांवर आधारित असावी लागते. आता यातही काही लोकांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणच करायचं असेल तर गोष्ट वेगळी. राजकीय नेत्यांनी खरे तर इतिहास, धर्मशास्त्र या विषयांवर भाष्यच करू नये. हा अधिकार इतिहास आणि धर्मशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचा आहे.”
मुनगंटीवार म्हणाले की, “विरोधक जर खरं सांगायला लागले तर ते राजकारण कसे करणार. ‘धर्मवीर’ आहे की नाही, सारखे वाद निर्माण केले जातात. आमच्या राजकीय नेत्यांना इतिहासात किती मार्क असतात, हे मला माहिती नाही. पण आम्ही आता कुठे इतिहासकार होत चाललो आहोत…” असा टोलाही मुनगंटीवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरून वाद, सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांचा घेतला असा समाचार
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा