२४ तासांत ४३७ रुग्णांची भर : सक्रिय रुग्णसंख्या २२०० वर
नागपूर. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर देश पूर्वपदावर परतला आहे. मात्र, कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढविली (Corona once again increased the tension ) आहे. देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गत आठवड्यात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ नोंदविली (increase number of patients) गेली. शनिवारी राज्यात ४३७ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा २२०० वर पोहोचली आहे. मृत्यूसंख्याही वाढते आहे. शनिवारी दोन जणांचा करोनामुळे मृत्यूची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. नवीन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. राज्यात दीड वर्षांपूर्वी कोरोनाचे लसीकरण करण्यात आले होते. शरिरातील अॅन्टीबॉडीज कमी झाल्याने आजार बळावत असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. सर्वाधिक रूग्ण पुण्यात (Pune ) आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
करोनाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्णही वाढू लागले आहेत. तसंच आता करोनाचे रूग्णही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. देशात ज्या ज्या राज्यांमध्ये एन्फ्लुएंझाचे रूग्ण आणि करोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या राज्यांना मार्गदर्शक सूचना केंद्रातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधे घेतली जाऊ शकतात. पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे असंही सांगण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये मॉक ड्रिल
कोरोनाव्हायरस आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या आणि बंदीस्त ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/ टिश्यू वापरण्यास सांगितले आहे. स्वच्छता राखण्यासाठी साबणाने किंवा वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टींग आणि लक्षणांबद्दल लवकर माहिती देण्यास सांगितले आहे. यासोबतच श्वसनाचे आजार असल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. १० आणि ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर याला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत आढावा घेतला जाणार आहे.