कोरोना, लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय
मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

0


नागपूर. सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चायना, कोरीया जपानमध्ये कोरोना सुरू झाला. तोच निकष आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजितदादांनाही माहीत आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे, असे खोचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विदर्भ –मराठवाड्याच्या विकासासंदर्भात सत्ताधार व विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यादरम्यान त्यांनी अनेकदा विरोधकांवर टिकास्त्र डागले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाच्या उद्घाटनावरुन विरोधकांनी वाद घातला. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा महामार्ग होऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांना जमीनी देऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले.मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दुर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता.


महाराष्ट्रात विदर्भ महत्त्वाचा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशात महाराष्ट्र महात्त्वाचा तसा महाराष्ट्रात विदर्भही महत्त्वाचा आहे. विदर्भाच्या बाबतीत सर्वांनाच संवेदना असावी. विदर्भाला काहीतरी द्यायला हवे. कालबद्ध पाऊले टाकण्याची इच्छाशक्ती हवी. सरकार म्हणून जबाबदारी पाळणार व काही तरी ठोस निर्णय घ्यायचे आहेत. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा