बंजारा बांधवांसाठी महामंडळ

0

50 कोटींचा निधी देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठ्या घोषणा
वाशिमः बंजारा समाजाच्या पोहरावेदी देवस्थान (Pohradevi Temple) येथे रविवारी आयोजित महामेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजबांधवांसाठी अनेक घोषणा केल्या. सरकार बंजारा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे (The government stands firmly behind the Banjara community) आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही. पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिला आहे. समाजाच्या मागणीनुसार बंजारा महामंडळाची स्थापना केली जाईल. मागणी केल्यानुसार महामंडळाला 50 कोटींचा निधी दिला जाईल. वसंतराव नाईक महामंडळालासुद्धा निधी कमी पडू देणार नाही. नवी मुंबई येथे बंजारा भवन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी बंजारा समाजातील मंत्री संजय राठोड यांचेही तोंडभरून कौतुक केले. ते समाजासाठी नेहमी अग्रेसर असतात. ते आमच्या सर्वांचे जिवाभावाचे मित्र, सखा आहेत. कायम त्यांच्या पाठिशी राहिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनीही बंजारा भाषेतून भाषणाची सुरूवात केली. उपस्थित समाजबांधवांनीही टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संकटकाळी संजय राठोड यांच्या सोबत
संजय राठोड यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी उभा राहिला. आम्हीही मित्र म्हणून त्यांची पाठराखण केली. ते मित्र, सखा आहेत. यामुळे आज कुटुंबाच्या कार्यक्रमात आलो असल्याचे वाटत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत, अशी पुष्टी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जोडली. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे-घेणे, असा विचार आम्ही केला नाही. तो आमचा आहे. आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला असल्याचे ते म्हणाले.