नागपूर. महावितरणने 67,644 कोटींची तुट भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव (Electricity tariff hike proposal) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) सादर केला आहे. त्यावर जनसुनावणीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. त्यानुसार 21 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान विभागनिहाय ई-सुनावणी (Division wise e-hearing) घेण्यात येणार आहे. नागपुरात 3 मार्चरोजी जनसुनावणी निश्चित करण्यात आली आहे. यंदा प्रथमच ई- सुनावणी अर्थात ऑनलाईन पद्धतीने जनसुणावनी होणार आहे. मात्र, नेमकी पद्धती कशी असेल याबाबत संभ्रम कायम आहे. 21 फेब्रुवारीला मुंबईत पहिली जनसुनावणी होणार आहे. नागपुरात 3 मार्चला सकाळी 10.30 वाजता धरमपेठ मार्गावरील वनामतीच्या ऑडटोरियममध्ये सुनावणी होणार आहे. महावितरणमधील सुत्रांच्या दाव्यानुसार आयोगाचे अध्यक्ष व सदस्य मुख्यालयातून व्हीसीद्वारे सुनावणीत सहभागी होतील आणि हरकत असणारे संबंधित ठिकाणी उपस्थित राहून म्हणणे मांडतील.
दरवेळचा अनुभव लक्षात घेता यंदाही हरकत मांडणाऱ्यांची शक्यता मोठी राहण्याची शक्यता आहे. पण, प्रथमच ई-सुनावणी होणार असल्याने हरकत नोंदविणाऱ्याचा प्रतिसाद कसा मिळतो ते पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
15 मार्चपर्यंत सादर करता येणार हरकती
वीजदरवाढीसंदर्भात जनतेकडून सूचना, हरकती मागविण्याचे निर्देश एमईआरसीने महावितरणने दिले आहेत. महावितरणनेही तशी सूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार इच्छुकांना लेखी स्वरूपात सूचना व हरकती एमईरासीच्या संकेतस्थळावरील ई- पब्लिक- कंसल्टेशन टॅबवर जाऊन सादर करता येतील. याशिवाय एमईआरसीच्या मुंबईतील सार्यालयातही लेखी स्वरुपात सूचना व हरकती पाठविता येतील. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5 पर्यंतच हरकती ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
महावितरण 3 दिवसांत देणार उत्तर
प्राप्त होणाऱ्या हरकतींना महावितरणकडून 3 दिवसांमध्ये अर्थात 18 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दिले जातील. त्यावरील हरकती, प्रतिप्रश्न असल्यास जनसुनावणीच्या वेळी ते मांडता येतील. पण, हरकतदार कुणल्या सुनावणीत उपस्थित राहतील, याबाबत पूर्वीच स्पष्टता करणे आवश्यक आहे.
संघटनांची तयारी
वीज दरवाढीला कडाडून विरोध दर्शविण्यासाठी ग्राहक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर आवाहन केले जात आहे. काही संघटनांनी छापील अर्जच तयार केले असून ते एमईआरसीला पाठविण्यास सांगण्यात येत आहे. ग्राहकांमध्ये देखील सुनावणीबाबत उत्सूकता दिसून येत आहे.