सत्तासंघर्षावर न्यायालय मेरिटप्रमाणे निर्णय देईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबईः “ज्यांना चिंता वाटते, तेच सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मजबूत असल्याचे माध्यमांना सांगत असतात. मी कधीही न्यायालयाच्या निर्णयावर बोललो नाही. हे आपले क्षेत्र नाही, न्यायालय मेरीटप्रमाणे निर्णय देईल” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेय. राज्यातील सत्तासंघर्षावरील महत्वाची सुनावणी उ्दाय १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक उच्च न्यायालयाला सल्ले देत होते. आता सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ले द्यायला लागले आहेत. आम्ही तर कधीही निवडणुकीसाठी तयार आहोत. मागील पाच सहा महिन्यात आम्ही इतकं काम केलेय की लोकांना कळले आहे. संधी मिळाली तर आणखी काम होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर (Hearing in Supreme Court) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकड राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून घटनाबाह्य सरकार असल्याचा आरोप देखील केला जातोय. येत्या काळात सर्वोच्च न्यायालयात नियमित स्वरुपात सुनावणी पार पाडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापिठासमोर ही सुनावणी सुरू आहे. उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने अपात्र आमदारांच्या मुद्यावर प्रथम निर्णय द्यावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि निवडणुक चिन्ह्यांवर दोन्ही गटांनी दावे केले असून त्याचा वाद निवडणूक आयोगापुढे आहे.