भटक्या विमुक्तांनी संघटित होऊन कार्य करावे

0

 

बिऱ्हाड परिषदेत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

साकोली (जि. भंडारा) : कोणत्याही समाजावर अन्याय त्याच वेळी होतो, ज्यावेळी तो संघटित नसतो. भटक्या विमुक्तांनी पोटजातींच्या सीमारेषा ओलांडत संघटित व्हावे व चिंतन,मंथनातून आपल्या समस्यांवर मात करावी.भटक्या विमुक्तांसाठी जे जे काही करता येईल ते ते आपण संपूर्ण शक्तीनिशी करू, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या विदर्भ प्रांत द्वारा आयोजित बिऱ्हाड परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, योगेश पुरी महाराज, बिऱ्हाड परिषदेचे आयोजक शेखर बोरसे, सहआयोजक राजेंद्र दोनाडकर, अखिल भारतीय घुमन्तु कार्यक्रम प्रमुख दुर्गादास व्यास, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, माजी आमदार राजेश काशीवार, जिल्हा सहसंघचालक अनिल मेहेर, भाजप उपाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, सुवर्णा रावळ, दिलीप चित्रीव, रामेश्वर भिसे, नरसिंग झरे उपस्थित होते.

आपल्या भाषणात ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा होईल त्यावेळी देशातील जातीपातीच्या भिंती नष्ट करण्याचा संकल्प देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी डोळ्यापुढे ठेवला आहे. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जात राष्ट्र प्रथम हा विचार त्यांनी देशापुढे मांडला आहे. राष्ट्रासाठी भटक्या विमुक्तांनीही सर्व शक्तीनिशी या कार्यात सहभागी व्हावे. समाजासमोर येणारी प्रत्येक आव्हाने दूर करून भटक्या विमुक्तांनी सकारात्मक संघर्षातून विकास साधावा. कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी जो चित्ररथ सहभागी झाला, त्याची जबाबदारी गोंधळी समाजाकडे सोपविण्यात आली होती. या चित्ररथाला पुरस्कारही मिळाला आहे. या चित्ररथामुळे गोंधळी समाजाने आपला सत्कार केला. ७२ वर्षांपर्यंत गोंधळी या भटक्या जमातीला कर्तव्यपथावर स्थान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. त्यांना आपल्यामुळे न्याय मिळाल्याचा आनंद फार मोठा आहे.

सरकारच्या योजनांबद्दल बोलताना ना.मुनगंटीवार यांनी सांगितले की, भटक्या विमुक्तांसाठी सरकारच्या योजना अनेक आहेत. परंतु या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. आताच्या सरकारमध्ये या योजना समाजापर्यंत पोहोचत आहेत. अशा योजना अधिक व्यापकपणे भटक्या विमुक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवक, युवतींची फौज उभारणे गरजेचे आहे. भटक्या विमुक्तांना संघटित करून साक्षर करणेही नितांत गरजेचे आहे. घरकुल मिळवून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण योजनेचा फायदा भटक्या विमुक्तांना करून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ही ना.मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. मिशन मोडमध्ये हे काम कसे करता येईल याचा आपण आग्रह मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे धरू असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रपुरातील जिवती सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी आपला पुढाकाराचा उल्लेख करीत ना.मुनगंटीवार म्हणाले की आदिवासी, भटक्या विमुक्त जाती शौर्यवान आहेत. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना आणल्या आहेत. अशा योजनांचा भटक्या विमुक्त समाजानेही लाभ घ्यावा. असे आवाहनही ना.मुनगंटीवार यांनी केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा