महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे.. राज्यपाल झाले भाज्यपाल, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, चोर है चोर है राज्यपाल चोर है च्या घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा देऊन विधान भवन परिसर दणाणून सोडला.आंदोलनकर्त्यांनी हातात संघाच्या काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरीत हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये असा त्यामागचा उद्देश्य असतो. राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहे. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहे, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलयं, अशी खरमरीत टीका यावेळी विरोधकांनी केली.
आंदोलनकर्त्या आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत आमदारांमध्ये किती असंतोष आहे हे दिसून येते. आंदोलन संपल्यानंतर त्या बुजगावण्याला लात मारून ते खाली पाडण्यात आले. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व आमदारांचा सहभाग होता.