भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. कधी थायलंडचे व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर दिसतील तर कधी राजस्थानचे. मास्टर-ब्लास्टर कुठे आहे याचा अंदाज लावणे चाहत्यांना कठीण होत आहे. मात्र, चाहत्यांना सचिनचे हे व्हिडीओ खूप आवडतात, ज्यामध्ये तो कधी कयाकिंग करताना दिसतोय तर कधी चुलीवर शिजवलेले अन्न खाताना. सचिनने यापूर्वीही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हायरल झाला आहे.सध्या तो राजस्थानमध्ये आहे आणि मागच्या दोन दिवसांत त्याने शेअर केलेल्या दोन व्हिडिओंवरून सचिनलाही चुलीवरच्या जेवणाची भुरळ पडल्याचं दिसतंय. तर, दुसऱ्या एका व्हिडिओत तो नवीन खेळ खेळताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सचिनने गुरुवारी 29 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राजस्थानमध्ये एकेठिकाणी मातीच्या चुलीवर अन्न शिजवलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला स्वयंपाक करताना दिसत आहेत आणि सचिन त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे. “चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव नेहमीच अनोखी असते,” असं त्याने म्हटलंय. तर, त्या दोन्ही महिलांनी त्या गहू आणि बाजरीची भाकरी बनवत आहेत, असं सांगितलं.
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “मलाही जेवण तयार करता येतं, पण गोल चपाती करता येत नाही. चुलीवर शिजवलेल्या अन्नाची चव वेगळी असते. गॅसवर शिजवलेल्या अन्नापेक्षा ते अधिक चविष्ट असतं.” अशातच सचिन तूप गूळ घेऊन जेवायला बसतो. त्यावर तो म्हणाला, “मी आयुष्यात इतकं तूप कधीच खाल्लं नाही. हे प्रेमाने भरलेलं तूप आहे. नंतर हे देसी तूप आहे का?” असंही त्या महिलांना विचारतो. व्हिडिओवर सचिनचे चाहते, ‘तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात’, ‘ त्या महिलांना माहीत नाही की त्यांच्या इथे साक्षात क्रिकेटचा देव आला आहे,’ अशा कमेंट्स करत आहेत.
सचिनने याआधी बुधवारीही एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा तो थायलंडमध्ये सुट्टी घालवत होता. 49 वर्षीय सचिनने थायलंडमध्ये कयाकिंग म्हणजे नौकानयन या खेळातही हात आजमावला. सचिनने वल्ह हातात धरून वल्हवायचं कसं याचेही ट्रेनरकडून धडे घेतले. तेंडुलकर म्हणाला की हे क्रिकेटमधल्या रिव्हर्स स्विंगसारखं आहे आणि तो पहिल्यांदाच या खेळाचा आनंद घेत आहे.