नैराश्‍य ही गंभीर समस्‍या, दुर्लक्ष नको – डॉ. सुधीर भावे

0

ध्रुवी वेलफेअर असोसिएशनचे आयोजन

नागपूर, 22 मार्च
जीवनात येणारे नैराश्‍य ही अतिशय गंभीर समस्‍या आहे. त्‍याबद्दल अनेक गैरसमज पसरलेले असल्‍यामुळे नैराश्‍य आलेल्‍या व्‍यक्‍तीकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. त्‍यामुळे नैराश्‍यग्रस्‍त लोक आत्‍महत्‍येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्‍यामुळे नैराश्‍याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्‍ला मानसोपचारतज्‍ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी दिला.
ध्रुवी वेलफेअर असोसिएशनच्‍या ‘नैराश्‍य’ विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे मंगळवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्‍पना ध्रुवी असोसिएशनच्‍या संचालिका स्‍वाती सिंग यांची होती. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर डॉ.सुधीर भावे, एक्‍युप्रेशन तज्‍ज्ञ डॉ.पराग कुलकर्णी, योग व निसर्गोपचार तज्‍ज्ञ संदीप पाथे व समुपदेशक अतुल राजोरिया यांनी यावेळी उपस्‍थ‍ितांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध गायक नरेंद्र पाल सिंग (निंदर) यांनी विविध सुफी गीते सादर करीत रसिकांचे मनोरंजन केले.
नैराश्य आणि आत्महत्या यांचा खूप जवळच संबंध असून भारतात 1 लाख लोकांमध्‍ये 80 मुली आणि 40 मुले आत्महत्या करतात. अचानक अंतर्मुख होणे, काम करण्‍याची इच्‍छा न होणे, रडणे, जगावेसे न वाटणे अशी अनेक लक्षणे नैराश्‍यग्रस्‍त व्‍यक्‍तीमध्‍ये दिसून येतात. अशा व्‍यक्‍तीकडे दुर्लक्ष न करता त्‍यांच्‍याशी प्रेम, विश्‍वासाने संवाद साधण्‍याची गरज असते. परिस्थिती बिकट असल्‍यास समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांची त्‍वरित मदत घ्यावी, असे डॉ. सुधीर भावे म्‍हणाले.
डॉ पराग कुळकर्णी यांनी अॅक्‍युप्रेशरच्‍या माध्‍यमातून नैराश्‍य कसे दूर केले जाऊ शकते यावर मार्गदर्शन केले. त्‍यांनी विविध मुद्रा आणि अॅक्‍युप्रेशर पॉइंटची माहिती दिली. संदीप पाथे यांनी शरीरातील पंचमहाभूतांच्‍या असंतुलनामुळे मानसिक आरोग्‍य बिघडत असल्‍याचे सांगितले. हे असंतुलन सुधारण्‍यासाठी शरीराची स्‍वतंत्र यंत्रणा असते. विविध योगासन व निसर्गोपचारामुळे टॉक्सिन शरीरातून कमी होतात आणि शरीर व मन सकारात्मक प्रतिसाद द्यायला लागते, असे ते म्हणाले.
संदेश सिंगलकर यांनी नैराश्‍यासारख्‍या गंभीर विषयावर काम करीत असल्‍याबद्दल स्वाती सिंग यांचे कौतुक केले. नवीन अग्रवाल व अतुल राजोरिया यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक स्‍वाती स‍िंग यांनी केले. कार्यक्रमाला अशोक सिंह सरसवार, विजयप्रभा सरसवार, पद्मिनी चव्हाण, अमोल चव्हाण, सीमा सरसवार, प्रज्ञा सरसवार, मोना नायर असे अनेक लोक उपस्‍थ‍ित होते.