गडकरींच्या कार्यालयात धमक्यांचे कॉल बेळगाव कारागृहातूनच, एका युवतीचीही चौकशी

0

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात आलेल्या धमकीचे कॉल बेळगाव येथील कारागृहातूनच आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून मंगळुरु येथील एका तरुणीची चौकशी केली जाणार (Nitin Gadkari Threat Case) आहे. या तरुणीचा फोन क्रमांक कॉलमध्ये देण्यात आला होता, अशी माहिती असून नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना झाले आहे. काल गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात पुन्हा धमक्यांचे कॉल आले होते. स्वतःचे जयेश पुजारी असे नाव सांगणाऱ्या इसमाने दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांकडे याची वाच्यता न करण्याचा इशारा देखील दिला होता.
या घटनेनंतर नागपूर पोलिस सतर्क झाले व गडकरी यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या दरम्यान, पोलिसांनी कॉलची तपासणी केल्यावर त्याचे लोकेशन बेळगाव कारागृह येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जयेश पुजारी हा सध्या बेळगाव कारागृहातच आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याने धमकी दिली की अन्य कोणी तसेच यामागे खोडसाळपणा आहे की काय, याचा तपास सुरु आहे. धमकीच्या फोन कॉलचे मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे. मंगळूरू येथील रजिया नावाच्या तरुणीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. ती सध्या रुग्णालयात आहे. गडकरी यांच्या कार्यालयाला धमकी देण्यापूर्वी तिला आम्ही तुझा नंबर एका कामासाठी देत असल्याचे फोन करून सांगण्यात आले होते. रजियाला फोन करून असे सांगणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारी असे सांगितले होते. त्याचप्रमाणे रजियाचा एक नातेवाईकही बेळगाव कारागृहातून सुटून बाहेर आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणातील एक एक साखळी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.