देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला सवाल
नागपूर, 07 जून (हिं.स.) : अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरात झालेल्या तणावावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पुढे आलीय. विरोधकांनी दंगलीची शक्यता वर्तवल्यानंतर लगेच तणाव कसा निर्माण होतो…? त्यांचे विधान आणि घडणाऱ्या घटनांचा काय संबंध याची चौकशी केली जाईल असे फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितले.
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात, दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाच्या घटना घडतात, याचे मला आश्चर्य वाटते असे फडणवीस म्हणाले. तसेच या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानक कोण पुढे आले आणि त्यांना कोणाची फूस आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण चौकशीअंती त्यावर सविस्तर बोलेनच. पण, विरोधकांच्या दंगलीच्या वक्तव्यांनंतर अनेक जिल्ह्यांत औरंगजेबाचे उदात्तीकरण हा काही साधा योगायोग नाही, याच्या खोलात आम्ही जाऊ. सार्याच लोकांचे एका सुरात बोलणे आणि त्याला लगेच एका विशिष्ट समाजातून त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण, हा योगायोग असूच शकत नाही. औरंगजेब कुणाला जवळचा वाटतो, हे आपल्या सर्वांना ठावूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या घटनेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, याचा शोध घ्यावा लागेल. या घटनांच्या मागे कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल. जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी तर अशा अवलादी पैदा केलेल्या नाहीत ना, याचाही शोध घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. कोल्हापूरमध्ये परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलिस बंदोबस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कायदा हाती घेऊ नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे औरंग्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही आणि असे करणार्यांना माफी नाहीच, असेही त्यांनी ठणकावले.
devendra gangadharrao fadnavis