माझी वसुंधरा अभियानात बुलढाणा नगर परिषद विभागात प्रथम

0

 

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागामार्फत 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत राबविलेल्या माझी वसुंधरा अभियान ३ अंतर्गत बुलढाणा नगर परिषदेस अमरावती विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

 

माझी वसुंधरा अभियान 0.3 हे पंचमहाभूते भूमी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या घटकांवर विशेष कार्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने सदर घटकांमध्ये प्रदूषणसारख्या समस्या कमी करून स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त शहर बनविणे या महत्त्वाकांक्षेने काम करीत आहे. या अभियानात नगर परिषद बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या सहकार्याने प्रभावीपणे कार्य करीत आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांचे मार्गदर्शन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे व सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे योगदानामुळे नगर परिषद, बुलढाणा हे यश प्राप्त करू शकले आहे. राज्यात प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक अनुक्रमे कराड, लोणावळा व बारामती यांना प्राप्त झाला आहे. मागील वर्षी वसुंधरा अभियान 2 मध्ये नगर परिषद, बुलढाणा राज्यभरातून “उंच झेप” अशा नावाचा पुरस्कार व 75 लक्ष रुपये नगर परिषदेस प्राप्त झाले होते. यावर्षी माझी वसुंधरा अभियान 3 अंतर्गत विभागात प्रथम व राज्यात दहावे क्रमांक प्राप्त केल्याने 1.5 कोटी रकमेचे बक्षीस मिळाले आहे. प्राप्त राशीतून पर्यावरणाच्या व वसुंधरेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.

पुढील वर्षी राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली.