सोशल मीडियावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची करडी नजर

0

बुलढाणा : राज्यात होत असलेल्या दंगलीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सतर्क असून जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेजवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची सायबर सेलच्या पथकाद्वारे करडी नजर आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही याकरीता जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोष्ट करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. गावांमधून पायी पेट्रोलिंग करून, चावडीवरून ग्राउंड लेव्हलवरून पोलिसांकडून लोकांशी संपर्क करून, शांतता कमिटीच्या बैठका घेवून, मोहल्ला कमेटीच्या बैठकासह कॉर्नर बैठका घेवून व ग्राम सुरक्षा दलामार्फतही पोलीस लोकांच्या संपर्कात येवून जनजागृती केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करणारी पोष्ट व्हायरल करून त्याला बळी पडणाऱ्या तरुण युवकांनाही पोलिसांकडून या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतलं जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गावांमध्ये, शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा पोलीस दल ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.