बुलढाणा – पिकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह अन्य मागण्यांसाठी 16 जून रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी बुलढाणा पोलीसांनी मोठ्या फौज-फाट्यासह रविकांत तुपकरांच्या बुलढाणा निवासस्थानी धडक देत त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर सर्व प्रथम बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व नंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांना नेण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशनमध्येच रविकांत तुपकर व जिल्हा प्रशासनाची चर्चा घडवून आणली, त्यामध्ये जिल्हा कृषि अधीक्षक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते..
या आंदोलनाच्या धसक्याने AIC पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील 50,757 शेतकऱ्यांच्या खात्यावर 70 कोटी रुपये जमा करण्याचे लेखी आश्वासन रविकांत तुपकरांना दिले.त्यापैकी 43 हजार 058 शेतकऱ्यांच्या खात्यावर 56 कोटी 75 लाख रुपये जमा झाले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 जून पर्यँत संपूर्ण पैसे टाकण्यात येतील असे लेखी आश्वासन जिल्हा कृषि अधीक्षक यांनी दिले आहे. उशिरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र शेतकरी व त्रुटी मध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात-लवकर पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. AIC कंपनीकडे असलेल्या उर्वरित १५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरही पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 174 कोटी रुपये मंजूर असून यातील 40 कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे.त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढून 24 जून च्या आत वंचित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर टाकून त्यांना मदत मिळून देण्यासंदर्भात आदेशीत केले आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात-लवकर मिळावी यासंदर्भात शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे.बँकांनी जे अनुदानाच्या पैश्याला होल्ड लावले आहे ते तातडीने काढण्याचे लेखी आदेश व सी-बील ची अट न लावता 100% पिककर्ज वाटप 15 दिवसात करण्याचे लेखी आदेश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक/जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना काढले आहे.या चर्चेमध्ये शासनाने बहुतांश मागण्या मान्य झाल्याने मुंबईतील आंदोलन तूर्तास स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत. असा इशाराही तुपकरांनी दिला आहे.