वॉशिंग्टन (Washington) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump)यांना लेखिका ई जीन कॅरोल (Author E Jean Carroll)यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यावर ट्रम्प यांना कॅरोलला तब्बल 41 कोटी रुपये इतकी बक्कळ भरपाई द्यावी लागणार आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल न्यायालयाने हा निकाल जाहीर केलाय. न्यायालयात 9 सदस्य ज्युरींने ट्रम्प यांना लैंगिक अत्याचार आणि कॅरोलची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवले. त्याचवेळी ट्रम्प यांच्यावरील बलात्काराचे आरोप ज्युरींनी फेटाळून लावले आहे.
हे प्रकरण असे की, मासिकाच्या लेखिका कॅरोल यांनी 2019 मध्ये तक्रार केली होती. ट्रम्प यांनी 1996 मध्ये मॅनहॅटन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा त्यांचा आरोप होता. ट्रम्प यांच्या भीतीपोटी जाहीरपणे ही तक्रार करायला आपल्याला २० वर्ष लागली, असेही कॅरोल यांनी सांगितले. ट्रम्प यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. आपण कॅरोलला ओळखतही नाही व तिला स्टोअरमध्ये भेटलो देखील नाही, असा दावा करताना ट्रम्प यांनी कॅरोलने आपल्या पुस्तकाचा खप वाढविण्यासाठी धादांत खोटी कथा रचल्याचे म्हटले होते.